• 398
  • 397

गाणगापूर माहात्म्य

भारतात वैष्णव आणि शैव पंथ याप्रमाणेच दत्तसांप्रदाय हा एक परमेश्वर उपासनेचा प्रमुख पंथ आहे. दत्तमहाराजांचे तीन प्रमुख अवतार आहेत.

१. श्री दत्तात्रेय: अत्रिमुनी व अनुसूया सती यांचे सुपुत्र.

२.  श्रीपाद श्रीवल्लभ: आंध्रप्रदेशात पीठापूरला माता सुमती व पिता आपळराजा यांचे उदरी जन्म झाला. मौजी बंधनानंतर त्यांनी कुरवपूर जि. रायचूर (कर्नाटक) येथे १२ वर्षे वास्तव्य केले…

३. श्री नृसिह सरस्वती: सुमारे ६०० वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील लाड कारंजा येथे माता अंबाभवानी व पिता माधव यांचे उदरी शके १३०१ (इ.स.१३७९) मध्ये जन्म झाला. श्री क्षेत्र काशी येथे संन्यास दीक्षा घेतली. त्यांनी आपल्या आयुष्याची शेवटची ३८ वर्षे श्री क्षेत्र गाणगापूर येथे अनेक चमत्कार करीत व्यतीत केली. श्री क्षेत्र गाणगापूर येथे मठ बांधुन माघ व. १ शके १३०१(इ.स.१४५९) रोजी आपल्या पादुका ठेऊन गुप्त झाले. आजही अनेक भक्तांच्या मनोकामना ते गुप्त रूपाने पूर्ण करीत आहेत.

श्रीगुरुचरित्रामध्ये त्यांनी दिलेल्या वचनाची ओवी खालील प्रमाणे आहे.

 

आम्ही असतो याची ग्रामी ।। नित्य अमरजा संगमी ।।

वसो मध्यान्ही मठधामी ।। गुप्तरूपे अवधारा ।।

 

लैकीक अर्थाने हे दत्तमंदिर या नावाने प्रसिध्द असले तरी तो मठ असून या क्षेत्राला काशी इतकेच महत्व आहे. म्हणूनच या क्षेत्राला दक्षिण काशी असेही म्हणतात.

मराठी गुरुचरित्र ग्रंथ सरस्वती गंगाधर यांनी शके १४७० (इ.स.१५४८) ला लिहून पूर्ण केले.

 

 

गाणगापूर : गाणगापूर हे पूणे-रायचूर रेल्वेमार्गापासून १४ मैलांवर आहे. ते भीमा – अमरजा संगमावर वसलेले आहे. इथेच श्री नृसिंह सरस्वतींचे वास्तव्य २३ वर्षे झाले. येथे त्यांनी अनेक “लीला” केल्या. “श्री गुरुचरित्र” या ग्रंथात त्यांनी केलेल्या लीला वर्णन केलेल्या आहेत.

बहुधान्य संवत्सर शके १४४० च्या सुमारास श्री गुरु निजानंदी बसले. त्यांनी श्री शैल्य येथे गमन करून कर्दळी वनात प्रवेश केला आणि तिथूनच त्यांनी माधव सरस्वतींना खास निरोप देऊन सिद्धांकडे पाठवले व प्रसादाचे कमलपुष्प दिले. श्रीगुरूंचे सर्व कार्य गाणगापूर येथेच घडले व आपल्या दिव्यदान्त  विभूतिमत्वाचे सर्व तेज या भुमीच्या अणुरेणूत संक्रमित केले म्हणूनच गेली ५ शतके हे स्थान दत्तोपसिकांच्या दृष्टीने असीम श्रद्धेचे झाले आहे.

भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात, असाध्य रोग, भूतबाधा तसेच अनेक व्याधी असलेल्या लोकांच्या व्याधी नष्ट होतात असा अनेक भाविकांचा अनुभव आहे. अनेक भक्त तेथे सेवा करण्यासाठी राहतात व आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करून आनंदाने परत जातात.

सध्या मंदिराचे बांधकाम चालू असून भक्त देणगी देत आहेत. तसेच मंदिरात व गावात स्वच्छता व पावित्र्य ठेवण्यासाठी भाविकांनी प्रयत्न करावेत.

गाणगापूरला भिक्षा माधुकरी मागण्याची प्रथा आहे तसेच अनेक जण मधुकरीसाठी देणगी देतात तेथे सतत अन्नदान चालते.